पेठ -सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात कुरवंडी येथे 2 तरुण, पारगावतर्फे खेड येथे 1 तरुण, असे 3 जण बाधित झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे यांनी दिली. जून महिन्यापासून ते आतापर्यंत पेठ येथे 8 जण बाधित होऊन 14 दिवसानंतर निगेटिव्ह झाले आहेत. मात्र, सातगाव पठार भागात कुरवंडी येथे 2 व पारगावात 1 असे तीन बाधित आढळले आहेत. त्यामुळे पठार भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसीलदार रमा जोशी व गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी त्वरित कुरवंडी गावातील व वेळेश्वर मंदिराला जाणारा रस्ता बंद केला आहे. कुरवंडी व पारगाव येथील दोन्ही गावांच्या सीमा सील करण्याचे आदेश देऊन गावातील सर्व व्यवहार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कुरवंडी हे पश्चिम भागातील व पारगाव हे पूर्व टोकाला ही दोन्ही गावे आहेत.
दोन्ही गावातील तीनही बाधित हे 25 वयोगटातील असून एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. त्यामुळे लोक भीतीच्या सावटाखाली आहेत.मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी कुरवंडी व पारगाव, पेठ परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्यावर दंड आकारणी सुरू केली आहे.