कराड (प्रतिनिधी) – कराड पालिकेत नव्यानेच रूजू झालेले मुख्याधिकारी डाके यांनी त्यांचा मुलाचा शैक्षणिक प्रवेश नगरपालिका शाळेत घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
मुख्याधिकारी रमाकांत डाके हे गत आठवड्यात कराड पालिकेत रूजू झाले आहेत. येथे आल्यानंतर आपल्या कुटूंबासमवेत स्थिरस्थावर होण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने त्यांचा मुलगा श्लोक याचा इयत्ता चौथी साठीचा प्रवेश शहरातील इतर खासगी शाळांमध्ये न करता नगरपालिका शाळेत त्यांनी केला आहे.
वास्तविक पाहता त्यांना शहरातील कोणत्याही खासगी शाळांमध्ये सहज प्रवेश मिळाला असता. मात्र, तसे न करता त्यांनी त्यांच्या मुलाचा नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये प्रवेश घेतला आहे. त्याबद्दल मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांचे त्यांचे आभार मानले. तसेच शहरातूनही डाके यांचे कौतुक होत आहे.