बातुराजा (इंडोनेशिया) – इंडो-पॅसिफिक प्रदेशात वाढत्या चिनी सागरी हालचालींदरम्यान अमेरिका, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्याने सुमात्रा बेटावर संयुक्त लष्करी सराव सुरू केला. अमेरिका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापूर येथील एकूण 5,000 हून अधिक सैनिक यंदाच्या सुपर गरुड शिल्ड सरावात सहभागी होत आहेत. 2009 पासून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव होत आहे.
व्यापक प्रमांणात होत असलेल्या या लष्करी युद्धसरावाला चीनने धोका म्हटले आहे. चीनच्या राज्य माध्यमांनी या प्रदेशात चीनचा वाढता लष्करी आणि राजनैतिक प्रभाव मर्यादित करण्यासाठी अमेरिकेवर नाटोप्रमाणेच इंडो-पॅसिफिक युती तयार केल्याचा आरोप केला आहे. ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, भारत, मलेशिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि पूर्व तिमोर यांनीही या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या सरावासाठी निरीक्षक पाठवले आहेत.
दुसरीकडे चिनी लढाऊ विमाने आणि ‘बॉंबर्स’ यांना संयुक्त युद्धाभ्यासासाठी थायलंड येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. ‘फॅल्कॉन स्ट्राईक 2020’ नावाने हा अभ्यास उत्तर थायलंड येथे होणार आहे. उभय देशांच्या हवाई दलांमधील परस्पर विश्वास आणि मैत्री वाढावी, तसेच प्रायोगिक स्तरावरील सहकार्य अन् विकासाला प्रोत्साहन मिळावे, हे या युद्धाभ्यासामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.