पिंपरी – शहरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अधिक संख्येने रुग्ण आढळणारे शहरातील तीन परिसर कन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे भाग बुधवारी (दि.23) रात्री सील करण्यात आले आहेत. पिंपरी गावठाण आणि थेरगावातील भागांचा यात समावेश आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे भाग सील करण्यात आले आहेत.
शहरात करोनाचे रुग्ण अधिक संख्येने आढळणारा भाग कंन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार गणेशनगर, थेरगाव येथील वाकड पोलीस स्टेशन चौक, शिवकॉलनी कमान, ओमकार कॉलनी लेन -2, रत्नदीप कॉलनी, मयूरबाग कॉलनी, मयूरेश्वर गणेश मंदिर व लोकमान्य कॉलनीचा भाग सील करण्यात आला आहे.
पिंपरी गावठाणातील पवनेश्वर मंदिर, कापसे चौक, शिवकृपा, पीसीएमसी कॉलनी, काशिबा शिंदे सभागृह या भागाबरोबरच पिंपरीतील भीमनगर परिसरातील शिवाजी महाराज पुतळा, गंगवा चौक, समृद्धी हॉटेल, सौदागर पूल आणि काटे पिंपळे रस्ता हे भाग सील करण्यात आले आहेत. या परिसरात सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता येईल. तर मेडीकल व दवाखाने पूर्ण वेळ खुली राहणार आहेत. बाहेरुन ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ मागविण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरातून नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.