कोची : सात माओवादी नक्षलवाद्यांचा चकमकीत मत्यू झाल्याच्या 2016 मधील घटनेचा बदला केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या हत्येने घेतला जाईल, अशी धमकी देणारे पत्र पोलिसांना मिळाले आहे.
हे पत्र मल्याळम् भाषेत असून त्यावर माओवादी संघटनेचा म्होरक्या बेडर मुसा याची स्वाक्षरी आहे. वटकारा पोलिसांना पोस्टाद्वारे हे पत्र पाठवण्यात आले. त्याचा तपास सुरू आहे, असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पलक्कड जिल्ह्यातील अट्टापडी येथील जंगलात आलिकडेच केरळ पोलिसांची माओवाद्यांशी चकमक उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवण्यात आले असावे असा अंदाज आहे.
होय, आम्हाला पत्र मिळाले आहे. ते जवळपासच्या भागातून पाठवले आहे. आम्ही तपास सुरू केला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. सात कॉंम्रेडांच्या मृत्यूचा मुँहतोड जवाब दिला जाईल, असे त्या पत्रात म्हटले आहे. या पत्रात एका उपनिरीक्षकालाही धमकी देण्यात आली असून त्याचा उल्लेख राज्याला धोकादायक, असा करण्यात आला आहे. पल्लकड जिल्ह्यात 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीत चात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर विजयन यांच्या सुरक्षेत यापुर्वीच वाढ करण्यात आली आहे. माओवादी सी. पी. जलील याचाही यावर्षीच्या सुरवातीला पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. तर 2017 मध्ये दोन माओवादी मरण पावले होते.