रायपूर : छत्तिसगढमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले. ती घटना बस्तर जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात घडली. संबंधित भागात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशातून पोलिसांचे विशेष पथक तिकडे निघाले. त्यावेळी अचानकपणे नक्षलवाद्यांनी त्या पथकावर गोळीबार केला. त्या हल्ल्यात दोन पोलीस मृत्युमुखी पडले.
हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना पोलीस पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. मात्र, त्या घटनेबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, बस्तर जिल्ह्यातच दुसऱ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. त्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला. त्या जवानाला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे समजते.