जातीचा विषय काढून विरोधकांकडून दिशाभूल : राजळे

शेवगाव  – विधानसभेची निवडणूक आल्यानंतर झोपी गेलेले विरोधक जागे झाले आहेत.लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले, आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करीत आहेत, ही निवडणूक भावनेच्या नव्हे तर विकासाच्या मुद्‌द्‌यावर आपण लढवत आहोत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. आज झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. सभेपूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. भीमराव फुंदे, बापूसाहेब भोसले, अभय आव्हाड, तुषार वैद्य, माणिक खेडकर, उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षाच्या काळात सर्वांना बरोबर घेत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता विकास कामे केली. सर्वांच्या सुखदुखात सहभागी झाले. चुकीचे राजकारण केले नाही, यापुढेही करणार नाही. सर्वच कार्यकर्त्यांना मान-सन्मान देण्याचा प्रयत्न केला. कुणातही भांडणे लावली नाहीत. विकासनिधी काय असतो, हे भाजप सरकारच्या काळात जनतेला समजले आहे. आज आपल्या सोबत आपले असंख्य भाऊ आहेत, काही पडद्याआड आहेत, या सर्वांच्या विश्‍वासावर आपला विजय निश्‍चित आहे. सूत्रसंचालन रवी सुरवसे यांनी, तर कमलेश गांधी यांनी आभार मानले. राष्ट्रवादीचे रामनाथ राजपुरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शेवगाव व्यापारी संघटना, जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीने आमदार मोनिकाताई राजळे यांना जाहीर पाठींबा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.