यंदा चोरट्यांचा “मौका’ चुकला

वटपौर्णिमेला सोनसाखळी चोरीची एकही घटना नाही
सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर

पिंपरी – दरवर्षी वटपौर्णिमेचा “मुहूर्त’ साधून चोरटे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरतात. परंतु यावर्षी पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा “मौका’च मिळाला नाही. वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करायला हातात पूजेचे ताट घेऊन घराबाहेर पडतात. चेन स्नॅचर्ससाठी त्या “इजी टार्गेट’ ठरत असत. यावेळी पोलिसांनी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करुन चोरट्यांना आळा घातला.

दरवर्षी सणाच्या दिवशी चोरांकडून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात असल्याने पोलिसांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहत होते. परंतु यावर्षी पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे सोनसाखळी चोरांचा वटपोर्णिमेचा “मौका’ हुकल्याचेच दिसून आले. शहरात रविवारी वटपौर्णिमेच्या दिवशीही एकही सोनसाखळी चोरीची घटना घडल्याची नोंद अद्याप कुठल्याही पोलीस ठाण्यात नाही. त्यामुळे नागरिकांसोबत पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडल्याचे दिसून आले.

यावर्षी मात्र चोरीच्या संभाव्य घटना लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त आर. के पद्मनाभन यांनी स्वत: लक्ष घातले होते. वटपौर्णिेमेच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच वटपुजेच्या ठिकाणी व विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्‍तांनी स्वत: पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याबाबतचे नियोजन केले होते. त्यामुळे, रविवारी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही साध्या वेशामध्ये बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. रस्त्यावर असलेला पोलीस बंदोबस्त अणि वटवृक्षाच्या जवळ चक्‍क पोलीस तैनात असल्यामुळे चोरट्यांना चोरी करण्याचा “मौका’ मिळाला नाही. त्यामुळे, यावर्षी पहिल्यांदाच वटपौर्णिमेच्या दिवशी एकही सोनसाखळी चोरीला जाण्याची घटना घडली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.