मुंबई – ज्या किटकापासून सर्वाधिक किळस येते, तो कीटक म्हणजे झुरळ. अस्वच्छतेच्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त असतो. झुरळ हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्याला किळस येते. प्रत्यक्षात घरामध्ये कामाच्या ठिकाणी आपल्याला झुरळांचा खूप त्रास होतो. झुरळांमुळे आजुबाजूची जागादेखील प्रदुषित होते. यामुळे विविध आजार होण्याचा धोका असतो.
इतकंच नाही तर झुरळ घरात असणा-या वस्तू, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचंही नुकसान करतात. बऱ्याचदा आपण पेस्ट कंट्रोल करूनही झुरळ पुन्हा येतात. पण या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय नक्की करून पाहा.
-झुरळं ज्या ठिकाणी आहेत तिथे लवंग ठेवावी. लवंगाच्या वासानं झुरळ पळून जातात.
-बोरिक पावडर दुधात भिजवून त्याचे छोटे गोळे करावेत आणि ज्या ठिकाणी झुरळांचा वावर असतो ते गोळे ठेवून द्यावेत.
-कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे झुरळ असतील तिथे करावा. कडुनिंबाची पावडर टाकल्यासही परिणाम दिसून येतील.
-बेकिंग पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन ती झुरळ फिरतात त्या ठिकाणी टाका. साखरेमुळे झुरळं आकर्षित होतील आणि बेकिंग सोडा खाल्ल्यानं झुरळ मरतील.
-काळी मिरे, कांदे आणि लसूणची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट पाण्यात मिसळा आणि झुरळ असतील त्या ठिकाणी स्प्रे करा.
-कॉफीच्या वासानं झुरळ बाहेर येतात. पाण्यात कॉफी टाकून ते पाणी आवश्यक त्या जागांवर स्प्रे करावं त्यामुळे झुरळ पळून जातील.