नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावावरून केलेल्या मानहानी प्रकरणी कारवाई झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या एका नेत्यावर पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना पंतप्रधानांचा फोटो फाडल्याप्रकरणी न्यायालयाने दंड ठोठावला आहे.
गुजरातच्या नवसारी येथील न्यायालयाने आमदार अनंत पटेल यांना 2017 च्या एका प्रकरणात कारवाई केली आहे. 2017 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडल्याचा आरोप पटेल यांच्यावर लावण्यात आला होता. दरम्यान न्यायालयाने पटेल यांना या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर फक्त 99 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.ए.धाधल यांच्या न्यायालयाने वांसदा (एसटी) सीटचे आमदार पटेल यांना घुसखोरी केल्याबद्दल दोषी ठरवले. 2017 मध्ये जलालपूर पोलिसात पटेल आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर सहा जणांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना 99 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. जर रक्कम भरली नाही तर या आरोपींना सात दिवस कारावास भोगावा लागणार आहे.