मुंबई – काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी राजू पारवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानत त्यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत (शिंदे गट) रस्सीखेच सुरू आहे. भाजपला रामटेकची जागा हवी आहे पण, अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगितले जात असतानाच राजू पारवे यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा केला जात आहे.