मुंबई – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत ७ आमदारांनी दांडी मारली. यात चव्हाण यांचे समर्थक असणाऱ्या नांदेडच्या ३ आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही अनुपस्थित आमदारांनी आपल्या गैरहजेरीचे कारण आपल्या कानावर घातल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसने राज्यसभेसाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. तत्पूर्वी, पक्षाने आपल्या आमदारांची विधीमंडळात एक बैठक बोलावली होती. या बैठकीला ३६ आमदार हजर राहिले. तर ७ आमदार गैरहजर राहिले. यात नांदेड जिल्ह्यातील आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर व माधवराव जवळगावकर या ३ आमदारांचा समावेश आहे. या तिघांनीही आपल्याला आपल्या अनुपस्थितीचे कारण कळवल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. आमच्या एका सहकाऱ्याच्या मुलाचे लग्न आहे, तर २ सहकाऱ्यांनी आम्हाला काही कारणास्तव येणे झाले नसल्याचे कळवले आहे, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
‘हे’ आमदार गैरहजर
जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर, अस्लम शेख, झिशान सिद्दिकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख आदी आमदार बैठकीला गैरहजर होते. आणखी एक आमदार वाटेत असल्याचा निरोप आला. काही आमदारांनी बैठकीला न येण्याचे कारण कळवले. पण तीन आमदारांनी काहीच कळवले नसल्याचे सांगितले जात आहे. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सर्वसामान्यांची आहे. कोणताही नेता गेला तरी फरक पडत नाही. महाराष्ट्रात भाजपला भीती आहे. त्यामुळे ते छोटे-मोठे प्रयत्न करत आहेत पण परिणामी काँग्रेसबद्दल लोकांची सहानुभूती वाढली आहे.
हंडोरे विजयी होणार
आमचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेससह राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांचे मतदान होईल, असे सांगतानाच सर्वाधिक मतांनी आमचा उमेदवार विजयी होईल असे पटोले यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे उद्या दोन दिवसीय शिबिर लोणावळ्यात होणार आहे. या शिबिरात सर्व आजी-माझी आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. काँग्रेसची आजची बैठक ही पूर्वनियोजित आहे.