आठ दुकाने फोडली
मंचर- चोरट्यांनी धुमाकुळ घालत निरगुडसर, पिंपळगाव, नागापूर (ता. आंबेगाव) येथील एकुण आठ दुकानांचे शटर उचकटून गल्ल्यातील रोकड व अन्य वस्तू शनिवारी (दि. 28) पहाटे लंपास केले. निरगुडसर येथील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यामध्ये पाच ते सहा चोरटे तोंडाला रुमाल बांधलेले दिसत आहेत.
निरगुडसर येथील एसटी स्थानकालगत दिलीप हरिभाऊ वळसे पाटील, मिलिंद बाजीराव वळसे पाटील, एकनाथ तुळेकर, रामदास मिंडे, रोहन टाव्हरे, हर्षद अन्सारी यांच्या दुकानांची शटर उचकटून एकुण दीड हजार रुपयांची रोकड आणि इतर खाण्याच्या वस्तू चोरट्यांनी चोरुन नेल्या. चोरट्यांनी नागापूर येथून मोटार सायकलमालक सागर उत्तम भोर यांची दुचाकी चोरुन आणल्याने तेथील ग्रामस्थ पाठलाग करीत निरगुडसर येथे आले होते. निरगुडसर येथील एसटी स्टॅंडलगत दुकानांचे शटर उचकटून चोरी करीत असताना चोरट्यांनी ग्रामस्थांना पाहिले. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला.
निरगुडसर ग्रामपंचायतीचे सदस्य आनंद वळसे पाटील यांना चोरीची माहिती समजताच त्यांनी मंचर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार सागर गायकवाड यांना कळविले. त्यानंतर मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सागर गायकवाड, सुधाकर जाधव, चंद्रशेखर डुंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांना चोरटे पारगावच्या दिशेने दुचाकी वाहनांवरुन गेल्याचे समजले. त्यामुळे पोलीस पथकाने चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी दुचाकी गाडी सोडून शेतात पळ काढला. पोलिसांनी चोरीची मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. दरम्यान, पिंपळगाव येथील अभिमन्यु गुलाब पोखकर आणि रविंद्र कृष्णाजी पोखरकर यांच्या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.