निगुडघर रस्त्याचे भूमिपूजन; निवडणुका जवळ आल्या की असले मुद्दे पुढे करायचे – थोपटे
भोर तालुक्यात सध्या गढूळ राजकारण झाले सुरू
भोर – भोर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन लोकांचे मागणीनुसार विकासकामे करीत असतो. मात्र, सध्या तालुक्यात गढूळ राजकारण सुरू झाले आहे. निगुडघर, गोळेवाडी ते म्हसर- शिर्के आवाड रस्त्याचे काम मी मंजूर केले आहे. हा रस्ता सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव दिला असताना जिल्हा परिषदेने मात्र, त्यासाठी ना हरकत दाखला नाकारला, असे निदर्शनास आणून देत करायचे काही नाही. निवडणुका जवळ आल्या की, श्रेयवादाचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करायची. सारे काही आम्हीच केले, असा आभास निर्माण करायचा, असे टीकास्त्र आमदार संग्राम थोपटे यांनी सोडले.
निगुडघर येथे निगुडघर ते म्हसर रस्त्याचे भूमिपूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. थोपटे म्हणाले, नीरा देवघर धरण भागातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कामे केली आहे. शिंदेवाडी (शिरवळ) ते वरंधा घाट रस्त्याचे काम केले आहे. या मार्गाच्या रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी 749 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
नीरा देवघर धरणाचे डाव्या कालव्याचे कामाचा उल्लेख करुन या कामाच्या आराखड्याचे नकाशाची माहितीही त्यांना सांगता येणार नाही, अशी बोचरी टीका त्यांनी विरोधकांवर केली. यावेळी भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेबा थोपटे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, अमर शेडगे, अनिल सावले, राजगड साखर कारखान्याचे संचालक सुभाष कोंढाळकर, दीपक गायकवाड, माजी सरपंच सुरेश राजिवडे,
म्हसरचे सरपंच एकनाथ मसुरकर, गोळेवाडीचे सरपंच सतोष गोळे, निगुडघरच्या सरपंच मंगल कंक, किसन कंक, संजय मळेकर, नारायण पारठे, संतोष दिघे, विजय शिरवले, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे शाखा अभियंता अजित पाटील, बबन मालुसरे, बाळासाहेब मालुसरे, लक्ष्मण पारठे, भाऊ पोळ, ग्रामस्थ उपस्थित होते. भोर बाजार समितीचे संचालक सुरेश राजिवडे यांनी प्रास्ताविक केले. सरपच संतोष गोळे यांनी आभार मानले.
सातबाराही आमचाच आहे, असे म्हणतील
निगुडघर, गोळेवाडी ते म्हसर- शिर्के आवाड रस्त्याचे काम मी मंजूर केले आहे. हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीला जागा मिळवून देऊन ही इमारत रस्त्याला लागून असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध दूर करुन ना हरकत दाखला मिळवला. मात्र, इमारतीच्या भूमिपूजनाचा नारळ दुसऱ्यांनीच फोडला. गोळेवाडी म्हसर रस्त्याचे काम दरवर्षी एक एक किलोमीटरचे काम केले असते तरी हा रस्ता पाच वर्षांत पूर्ण झाला असता, असे नाव न घेता टीका केली. उद्या या जागेचा सातबाराही आमचाच आहे, असे म्हणतील असा चिमटा काढून राष्ट्रवादीचे नाव न घेता आमदार थोपटे यांनी जोरदार कोपरखळी लगावली.
धरण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार
नीरा देवघर धरण प्रकल्पातील 65 टक्के रक्कम कपात न झालेल्या शेतकऱ्यांनी नुकतेच आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार थोपटे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार राज्याचे पुनर्वसन सचिव गुप्ता यांच्याशी बैठक घेऊन धरण प्रकल्पातील शेतकऱ्यां प्रश्न सोडवला असल्याचे आमदार थोपटे यांनी यावेळी सांगितले.