सातारा – वहागाव (ता. कराड) येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त ठेवलेल्या मांसाहारी जेवणातून 24 जणांना विषबाधा झाली होती. त्यापैकी एका वृद्धाचा कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील रुग्णांना कराड व विटा येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी वहागावामध्ये आणि संबंधित हॉस्पिटलला भेट देऊन उपचारांची माहिती घेतली.
वहागाव (ता. कराड) येथे शुक्रवारी (दि. 9) धार्मिक कार्यक्रमानिमित्त मांसाहारी जेवण ठेवण्यात आले होते. यामध्ये गावातील आणि बाहेरगावातील 35 लोक जेवले. त्यातील 24 जणांना अन्नातून विषबाधा होऊन उलट्या, जुलाब होऊ लागले. त्यांना उपचारासाठी कराड व विटा या ठिकाणी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामधील बहुतांश लोकाची प्रकृती बरी आहे. विषबाधा झालेल्या एका वृद्धास जास्त त्रास होऊ लागल्याने, त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने, कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनी वहागावला तातडीने भेट देऊन, संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार उंब्रज प्राथमिक आरोग्य
केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावामध्ये घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण केले. या ठिकाणाहून भाकरी, तांदुळ आदीचे नमुने घेण्यात आले आहेत. संबंधित घरातील पाच लोकांचे स्टूल सॅम्पल आणि पाण्याचे नमुने घेऊन जैविक तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सध्या वहागाव येथील परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असून, बाधितांना संपूर्ण औषधोपचार देण्यात येत आहेत. उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथक गावात कार्यरत असून, सर्व घरांमध्ये सर्व्हेक्षण आणि औषधोपचार करण्यात येत आहेत. सध्या उन्हाळा असून, लोकांनी शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत. पाणी उकळून प्यावे. यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये अन्नपदार्थ तयार करताना सर्व प्रकारची काळजी घ्यावी, जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.
– डॉ. प्रमोद शिर्के,जिल्हा आरोग्य अधिकारी