पुणे – महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात बसवलेल्या लिक्विड ऑक्सिजन टॅंक मुळे आता महापालिकेच्या अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
डॉ. नायडू रुग्णालयात 13 किलोलीटर क्षमतेचा ऑक्सिजन टॅंक बसवण्यात आला आहे. येथे त्यांची केंद्रीभूत पद्धती बसवण्यात आली आहे.त्यामुळे ऑक्सिजन संपले किंवा त्याची अनुपलब्धता हा प्रश्न आता संपला आहे. याचे नुकतेच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
या रुग्णालयातून महापालिकेच्या लायगुडे, बोपोडीतील खेडेकर आणि दळवी रुग्णालयात ऑक्सिजनचे ड्युरा सिलेंडर भरून नेता येणार आहेत. त्यामुळे या सर्व रुग्णालयांत आता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, अशी खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असून, महापालिकेची रुग्णालये पुन्हा एकदा फुल्ल होत चालली आहेत.