राजगुरूनगर – खेड घाटातील वळणावर रविवारी (दि.23) मालवाहू टेम्पो व दुचाकीची धडक झाल्याने ट्रक उलटला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत उलटलेला टेम्पो क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने 10 मिनिटाच हटवल्याने पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. दरम्यान, या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला.
खेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव म्हणाले की, नाशिककडून पुण्याला निघालेला टेम्पो (एमएच 14 सीपी 4385) दुपारी खेड घाटाच्या मध्यावर टेम्पो व एका दुचाकीची (एमएच 14 एफबी 3560) धडक झाली. या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गावर उलटला. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक काहीकाळ थांबली होती.
मात्र, अवघ्या 10मिनिटांत पोलीस घटनास्थळी हजर झाले व क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने उलटेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला केल्याने लागलीच वाहतूक सुरळीत झाली. मोठा अपघात होऊनदेखील महामार्गावर रविवारी पहिल्यांदा वाहतूककोंडी न झाल्याचा अनुभव प्रवाशांनी घेतला.
दरम्यान, अपघातानंतर अपघातग्रस्त दुचाकीचालकांना उचलण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांना त्वरीत रुग्णालायत भरती केले असले तरी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.पोलीस हवालदार विक्रम तापकीर, सर्जेराव बागल, अमर वंजारी, संतोष शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली.