आढळा धरण ओव्हर फ्लो

लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण
अकोले (प्रतिनिधी) –
भंडारदरा, भोजपूर ही धरणे भरल्यानंतर अकोले, संगमनेर व सिन्नर या तीन तालुक्‍यांसाठी वरदान ठरलेले आढळा धरणही आज दुपारी ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे लाभ क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यामध्ये उगम पावणाऱ्या प्रवरा, म्हाळुंगी व आढळा नद्यांवरील धरणे भरतात की नाही? अशी जून महिन्यात स्थिती होती. पण वरुणराजाच्या धुवॉंधार बॅटिंगमुळे ही धरणे भरून वाहू लागले आहेत. तसेच निळवंडे धरण लवकरच ओव्हर फ्लो होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
आढळा नदीवर देवठाण येथे बांधण्यात आलेले आढळा धरण आज (दि.23) दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरले असून, ओव्हर फ्लो झाले आहे. सध्या धरणाच्या ओपन चॅनेल पध्दतीच्या सांडव्यावरून अंदाजे 100 क्‍यूसेक्‍सने विसर्ग आढळा नदीमध्ये सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता हरिश्‍चंद्र चकोर यांनी दिली.

आढळा धरणाची एकूण साठवण क्षमता 1060 द. ल. घ. फूट (1.060 टीएमसी) इतकी असून, मृतसाठा 85 द. ल. घ. फूट इतका आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 975 द. ल. घ. फूट इतका आहे. या धरणाची लांबी सुमारे 623 मीटर इतकी असून, धरणाची उंची 40 मीटर इतकी आहे. आढळा धरण हे माती धरण प्रकारातील आहे. धरणाचा सांडवा हा ओपन चॅनेल पद्धतीचा आहे. सांडव्याची विसर्ग वहन क्षमता सुमारे 54 हजार 900 क्‍यूसेक इतकी आहे. आढळा धरणाचे काम हे सन 1960 मध्ये सुरू करण्यात आले होते. पण वेळोवेळी त्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे धरण 1976 मध्ये पूर्ण झाले. आतापर्यंत आढळा धरण 25 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र सुमारे दोन हजार 422 हेक्‍टर आहे. काही प्रमाणात खरीप हंगामात व मुख्यत्वे रब्बी हंगामात नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील सहा, संगमनेर तालुक्‍यातील सात गावांना व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍यामधील दोन गावांना या धरणाच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होतो. तसेच या धरणावर अकोले तालुक्‍यातील देवठाण, हिवरगाव आंबरे, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे व डोंगरगाव या गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत.

धरणाच्या जलाशयातून जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना उपसा जलसिंचन योजनांसाठी देखील परवानगी दिली आहे. या धरणाचा डावा कालवा हा 8.80 किमी लांबीचा व 42 क्‍यूसेक वहन क्षमतेचा आहे. त्याद्वारे सिन्नर तालुक्‍यातील कासारवाडी व नळवाडी या दोन गावांना व अकोले तालुक्‍यातील डोंगरगाव तसेच संगमनेर तालुक्‍यातील चिकणी, निमगाव भोजापूर, जवळेकडलग, राजापूर या चार गावांना शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तसेच या धरणाचा उजवा कालवा हा 11.80 किलोमीटर व 68 क्‍यूसेक वहन क्षमतेचा आहे. त्याद्वारे अकोले तालुक्‍यातील देवठाण, हिवरगाव आंबरे, वीरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे या पाच गावांना तसेच संगमनेर तालुक्‍यातील वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, जवळेकडलग व धांदरफळ या चार गावांना शेती सिंचनासाठी पाणी देण्यात येते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.