कराड – उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या आणि करोनाची बाधा झालेल्या उंब्रज व वनवासमाचीील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तींना गुरुवारी (दि. 30 एप्रिल) वाठार, ता. कराड येथील फार्मसी कॉलेजमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे; परंतु क्वारंटाइन करण्यात आल्यापासून आजअखेर त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी नेण्यास उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना वेळच नाही. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रविवारी काही रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून काही रुग्णांचे प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील औषध विभागात काम करणारी 28 वर्षीय युवती व वनवासमाचीतील 12 जण करोनाबाधित असल्याचे गुरुवारी (दि. 30 एप्रिल) जाहीर झाल्यानंतर कराड व उंब्रजमध्ये खळबळ उडाली. येथील 28 वर्षीय नर्सच्या संपर्कातील तिच्या आई-वडिलांसह सात तर वनवासमाचीील 20 जण हाय रिस्कवर आहेत. त्यांना तातडीने वाठार, ता. कराड येथील फार्मसी कॉलेजमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. करोनाबाधितांच्या निकट सहवासात आलेल्यांना क्वारंटाइन करून तीन दिवस झाले तरी उपजिल्हा रुग्णालय किंवा कृष्णा हॉस्पिटलकडून त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी अद्यापही घेण्यात आलेले नाहीत. वास्तविक रुग्णांच्या निकट सहवासीतांच्या स्वॅबचे तपासणी अहवाल आल्यानंतर तातडीने पुढील सायकल शोधण्यास मदत होते; पण त्यांचे नमुनेच घेण्यात आले नाहीत.
या कालावधीत क्वारंटाइन करण्यात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह आला आणि त्याचा निकटचा सहवासीत फिरत राहिला तर करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका आहे. उंब्रजमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळल्याने सुमारे 40 हजार लोकवस्ती असणारी बाजारपेठ बंद आहे. हाय रिस्क व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत लॉकडाऊन शिथिल होणार नाही. करोनाचे सावटही गडद होत राहणार आहे.
“कृष्णा’ची लॅब कधी सुरू होणार?
करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येतात. त्यांचा अहवाल यायला दोन दिवस लागत आहेत. शिवाय तेथील लॅबबर ताण आहे. हे लक्षात घेऊन कृष्णा हॉस्पिटलला करोना चाचण्यांची परवानगी मिळाली आहे. आता ही लॅब कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे.