देहूगाव – संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेला महाप्रसाद वाटप सोहळा महाराष्ट्रात कोठेही पाहायला मिळून येत नाही. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.आस्थेने पोटभर जेवू घालण्याइतकं दुसरं सत्कर्म नाही, अशा शब्दांत आमदार सुनील शेळके यांनी संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या अन्नदान उपक्रमाचे कौतुक केले.
मंडळाच्या वतीने अधिक मासानिमित्त 18 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान देहूत अन्नदान करण्यात येत आहे. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिन्यामध्ये दानधर्म करण्याची हिंदू धर्मामध्ये प्रथा असल्याने अनेक जण अन्नदान करण्यासाठी पंगत लावत आहे. आमदार सुनील शेळके यांच्या पंगतीने अन्नदानउपक्रमाला सुरुवात झाली आहे. मात्र राजकारणातील घडामोडींमुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते.
दरम्यान, प्रताप सिंग आणि मंगला यांच्या स्मरणार्थ महिला व बालकल्याण समिती सभापती पोर्णिमा परदेशी, सामाजिक कार्यकर्ते विशाल परदेशी कुटुंबीयांच्या वतीने रविवारी (दि.6) अन्नदान करण्यात येत असताना आमदार शेळके यांनी मंडळास सदिच्छा भेट दिली. मंडळाच्या वतीने तुकाराम महाराजांची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष आनंदा काळोखे,राजू बुचडे,लक्ष्मण कंद, बाबा भालेकर, प्रकाश भोसले, चेतन लगाडे उमेश टिजगे, चंद्रकांत भोसले आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.