“योग्यते’बाबत दिरंगाई चालणार नाही

आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर होणार निलंबनाची कारवाई

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) “फिटनेस’ तपासणीसाठी आलेल्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यालयाकडून वापर केला जात असून संपूर्ण तपासणीचे चित्रीकरण देखील केले जात आहे. फिटनेस अर्थात योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक सूचना पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

दरवर्षी प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला फिटनेस तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही वाहने फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात आणली जातात. प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या या वाहनांमध्ये वाहन मालकांकडून बदल केले जातात आणि जास्त माल व प्रवासी बसवण्याचा प्रयत्न केला जातो. निश्‍चित करुन दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि माल बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन मालकांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयाकडून कडक पाऊले उचलली जात आहेत. आरटीओ कार्यालयाकूडन देण्यात आलेल्या माहितीनुसार तपासणीसाठी आलेल्या वाहनांची वाढलेली उंची, लांबी-रुंदी काटेकोरपणे तपासणी करुनच फिटनेस सर्टिफिकेट आरटीओ कार्यालयाकडून देण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर फिटनेस तपासणीमध्ये काटेकोरपणा आला आहे. प्रमाणपत्र देत असताना होणाऱ्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. याच्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काम करण्याचे वरिष्ठाकडून आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही न करणाऱ्या वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

वाहनांच्या मूळ उंची- लांबी-रूंदीमध्ये अनेक बदल करुन मालवाहतूक वाहनांची उंची वाढवून मालवाहतूक करण्यात येते. तर, प्रवासी वाहनचालकही आसनक्षमतेमध्ये बदल करतात. अशा वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, आता याला आळा बसला असून फिटनेस ट्रॅकवर आलेल्या वाहनांची बारकाईने तपासणी केली जात आहे. लांबी, रूंदी किंवा उंची वाढविलेल्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहे. तसेच, वाहनांवर रंगीबेरंगी स्टीकर, रेडीअम व इतर साहित्य चिटकवण्यात येतात त्या वाहनांना कार्यालयाकडून फिटनेस प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहे.

आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी आलेल्या वाहनांची फिटनेस तपासणी चित्रीकरण करूनच केली जात आहे. त्यानुसारच त्यांना फिटनेस प्रमाणपत्र दिले जात आहे. कुठल्या वाहनचालकांने वाहनांची उंची अथवा आसनक्षमता वाढवली असेल, तर त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यासाठी वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार निरीक्षक काटेकोरपणे तपासणी करत आहे.
– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.