हवेली, खेड, भोर आणि पुरंदर तालुक्यांतून जाणार मार्ग : 62 किलो मीटर लांबीचा असणार
पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. हवेली, खेड, भोर आणि पुरंदर या तालुक्यांतून जाणारा हा रिंगरोड असून त्याची लांबी सुमारे 62 किलो मीटर असणार आहे.
एमएसआरडीसीच्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच, त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली असून त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आता हा टप्पा पार केल्यानंतर पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार तालुक्यांतून हा रिंगरोड जाणार आहे. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित असलेल्या पुरंदर विमानतळावर जाण्यासाठीचा मार्ग देखील त्यामुळे उपलब्ध होणार आहे. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून एमएसआरडीसीने नव्याने सर्वेक्षण करून या रिंगरोडची आखणी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा असणार दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड
एमएसआरडीसीच्या दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मुळ, सानोरी, दिवे, चांमळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रुक असा असणार आहे.