पिंपरी – विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात 2466 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. शुक्रवार (दि. 27) पासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने विधानसभेच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडवी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक आयोगाची उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर राहणार आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात 411 मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर सध्या प्रशासनातर्फे 20 टक्के वाढीव पद्धतीने “ईव्हीएम’ उपलब्ध केल्या आहेत. उमेदवारांच्या अर्ज माघारीनंतर किती उमेदवार रिंगणात राहतात, यावर वाढीव मशीन मागवायच्या की नाही? हा निर्णय घेण्यात येणार आहे.