एक वर्षाच्या आत वाहन परवानाचे नूतनीकरण करणे बंधनकारक
पिंपरी – मुदत संपलेला वाहन परवाना एक वर्षाच्या आत नूतनीकृत केला नाही तर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे. मोटार वाहन दुरुस्ती कायद्यांतर्गत आता वाहन परवाना मुदतीमध्ये नूतनीकरण केला नाही तर वाहन परवाना बाद होणार असून पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अर्थात परत लर्निंग लायसन्स (शिकाऊ परवाना) काढावे लागणार आहे. त्यानंतर एक महिन्यांनी कायम परवाना दिला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने मोटार वाहन दुरुस्ती कायद्यामध्ये बदल केलेले होते. त्यानुसार, चालकाला दिलेल्या वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतरही बहुतांश जण अनेक दिवस आपल्या वाहन परवान्याचे नूतनीकरण करीत नसल्याचे अनेक वेळी स्पष्ट झाले होते. या गोष्टीला आळा घालण्यासाठी शासनाने आता कडक पाऊल उचलले आहे. आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, परवाना संपलेल्या व नूतनीकरणासाठी येणाऱ्या अर्जावर यापुढे अधिक गांभिर्याने पाहिले जाणार आहे.
ज्या व्यक्तीचा वाहन परवाना संपून अनेक दिवस उलटले आहेत, अशा अर्जदारांना आता पुन्हा लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. नवीन अर्जाप्रमाणेच कायम परवान्यासाठी एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नव्या नियमानुसार परवान्यासाठी पुन्हा कागदपत्र अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक पद्धतीने लर्निंग शिकाऊ अनुज्ञप्तीप्रमाणे टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यामुळे परवान्याची मुदत संपल्यानंतरही त्याचे नूतनीकरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालकांना आता पुढील काळात चांगल्याच अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत राज्यातील सर्व 50 प्रादेशिक परिवहन कार्यालयास हा नवीन नियम लागू करण्यात आला असून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही या नियमांची अमंलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे.
ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून होणार जनजागृती
अनेकांना या नवीन नियमनाबाबत माहिती नाही. याकरिता राज्यातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलचालकांना जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिलासा एकच आहे नवीन नियमाप्रमाणे आता राज्यात कुठेही ड्रायव्हिंग लायसन्सकरिता अर्ज करता येणार आहे. नवीन कायद्यानुसार ही बाब अनिवार्य असल्याने वाहनधारकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
नूतनीकरण करणे हाच एकमेव पर्याय
वाहन परवाना मुदत संपल्यानंतर एक वर्षाच्या आत नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. अन्यथा पुन्हा लर्निंग लायसन्सकरिता नवीन अर्ज करावा लागेल. वाहनचालकांनी परवाना मुदत तपासून मुदतीच्या प्ूर्वी नूतनीकरण करावे. – आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी