पिंपरी – चिंचवडगाव येथील चापेकर चौकात फुगे आणि खेळणी विक्रेत्यांनी अतिक्रमण करीत येथील सर्कलमध्ये बस्तान बसविले होते. शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करीत येथील फेरीवाल्यांना हटविले. यामुळे चापेकर चौकाने मोकळा श्वास घेतला.
चिंचवडगावातील चापेकर चौकात नेहमीच फेरीवाले अतिक्रमण करतात. महापालिकाही वेळोवेळी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करते. मात्र दिवाळीपासून चापेकर चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या सर्कलमध्ये फुगे आणि इतर खेळणी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले. एवढेच नव्हे तर त्यांनी या सर्कलमध्ये आपला संसारही थाटला. यामुळे आधीच फेरीवाल्यांमुळे विद्रूप झालेला चापेकर चौक आणखी विद्रुप झाला. येथील फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
शनिवारी दुपारी “ब’ प्रभागाचे कार्यालयीन अधीक्षक अरूण सोनकुसरे, अतिक्रमण निरीक्षक मनोज शिंदे, राजू ढगे, नाना देवचक्के यांच्या मार्गदर्शनाखाली येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 20 कर्मचारी, महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील पोलीस आणि 20 होमगार्ड सहभागी
झाले होते.
“”चापेकर चौकात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. जवळच न्यू इंग्लिश स्कूल आणि महापालिकेची शाळा आहे. तसेच ज्या फेरीवाल्यांनी आपला संसार थाटला होता त्यांचीही मुले सर्कलमध्ये राहत होती. येता-जाताना त्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याठिकाणी कारवाई होणे गरजेचे होते. नागरिकांना सुरक्षितरित्या चालता यावे, यासाठी अशाच प्रकारे चिंचवडमधील सर्वच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई होणे गरजेचे आहे.”
राजेंद्र गावडे, स्थानिक नगरसेवक