बारामती, (प्रतिनिधी)- वयोवृद्ध आईवडिलांची जबाबदारी स्वीकारून पालन पोषणाची सेवा करा. वृद्धाश्रम बंद होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.
ढेकळवाडी (ता. बारामती) येथे चंद्रभागा हगवणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजीत किर्तन निरूपम कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आई वडिलांची सेवा केल्यामुळे तुमचे संस्कार तुमच्या मुला मुलीवर होऊन तुम्हच्या म्हातारपणी ते सुद्धा अशीच काळजी घेऊन संगोपन करतील. “आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता -पिता तयाचिया ” या अंभगाच्या ओवीवर त्यांनी निरूपण केले.
आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून मदतीपेक्षा आधार द्या. हसत समाधानाने जगा.आई वडिलाने मुलासाठी संपती जमवण्यापेक्षा त्यांच्यावर संस्काराचे धडे द्या, असा संदेशही पुरुषोत्तम महाराज यांनी दिला.
दरम्यान, चंद्रभागा हगवणे यांचा विविध धार्मिक कार्यक्रमाने अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. पुरुषोत्तम महाराज यांच्या हस्ते चंद्रभागा हगवणे यांची ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, तुकाराम गाथा, हरिपाठ, गोंदवले महाराज प्रवचन पुस्तके, भजनी मालिका, आदींसह रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, शिवलीलाअमृत, मुळस्तंभ आदी ग्रंथाची ग्रंथतुला करण्यात आली.
यावेळी अमोल महाराज करे, महेश महाराज शिंदे, दतात्रय महाराज घुले, शिवाजी महाराज बंडगर यांनी गायनाची तर विशाल महाराज दराडे व आण्णा महाराज डोंबाळे यांनी पखवाज वादनाची साथ दिली. अनिल रूपनवर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र हगवणे यांनी स्वागत केले. हगवणे कुटुंबीयांच्या वतीन ग्रंथदान व महाप्रसाद देण्यात आला.