मुंबई – राज्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून विधान सभेवर घेण्याच्या प्रस्तावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण होतो की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अशी परिस्थिती उद्भवल्यास महाविकास आघाडीकडे आणखी एक पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलंय.
याबाबत बोलताना भुजबळ यांनी, राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभेवर घेण्याच्या प्रस्तावास वेळेत मान्यता न दिल्यास, ‘महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरेंना आपला नेता निवडण्यात येईल. यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. परत सगळं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि आपलं काम सुरू करेलं.’ अशी माहिती दिली.
यावेळी बोलताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार बनण्यास पात्र असून राज्यपाल कोश्यारी देखील याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय देतील असा विश्वास व्यक्त केला.