तळेगाव स्टेशन – तळेगाव नगरपरिषद परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करणारे नागरिक, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या वाहनांची नगरपरिषद तसेच पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांनी नोंद करावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तळेगाव पोलीस ठाणे यांनी केले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य व्यक्तींना पुणे तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतून ग्रामीण हद्दीत प्रवेशास बंदी आहे.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरांना रेडझोन म्हणून शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु या दोन्ही शहरांत आपत्कालीन कामासाठी ग्रामीण भाग आणि लगतच्या नगरपरिषद हद्दीतील अनेक नागरिक ये-जा करीत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील शेतमाल, दूध पुरवठ्यासह वैद्यकीय आणि पीएमपीएमएल कर्मचारी देखील संचारबंदी काळात वाहनातून ये-जा करीत असतात. या संबंधितांनी नगरपरिषद प्रशासनाकडे आपल्या वाहनांची तसेच आपलीही नोंद करावी.
भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच विनानोंदणी कोणीही प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी माहिती नगरपरिषद व पोलीस प्रशासनास कळवावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. विनानोंदणी असा प्रवास करताना कोणी आढळून आल्यास या व्यक्तीस 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.
नगरपरिषदेस माहिती कळवा
नोंदणीसाठी तळेगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयंत मदने (9595791904) तसेच तळेगाव नगरपरिषद कार्यालय (02114-222449) येथे संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक – 18002332734.