खासदार गिरीश बापट यांच्याकडून आढावा बैठका : पालिका निवडणुकीची तयारी
पुणे – महापालिका निवडणुकीला अवघ्या वर्षभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप सक्रिय झाला असून खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नगरसेवकांच्या गेल्या चार वर्षांचा कामाचा लेखा-जोखा तसेच आगामी वर्षभरातील प्रकल्पांचा आढावा घेतला जात आहे. या आढाव्यातून नगरसेवकांकडून शहरात चांगले काम केले जात असून या कामाच्या जोरावर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास खासदार बापट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सरचिटणीस राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.
खासदार बापट म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून याबाबत बैठका सुरू आहेत. त्यात नगरसेवकांनी केलेला विकास आणि सामाजिक कामे, उभारलेले प्रकल्प, अर्धवट प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आवश्यक निधी आदींबाबत चर्चा करण्यात आली असून अतिशय सकारात्मक पद्धतीने ही चर्चा सुरू आहे. त्यानुसार, पुढील वर्षभरात कशाप्रकारे विकासकामांचे नियोजन करायचे हे या आढाव्यातून ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर, पुणे शहराच्या विकासासाठी जो काय निधी मिळाला आहे, तो देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मिळाला असून केंद्र सरकारच्या अनेक योजनांमधून मिळाला आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारने अद्याप काहीच निधी दिला नाही. सामाजिक कामे करणे ही आमची बांधिलकी आहे. करोनाचे संकट यशस्वीपणे हाताळले.
स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. काही प्रकल्प भूसंपादनामुळे रखडले आहेत. ते पुढाली काळात पूर्ण होतील. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून द्यायचा प्रयत्न केला. स्थायी समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी यासाठी सकारात्मक भूमिका पार पाडली. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने सुमारे 200 कोटी रुपये निधी दिला असल्याचेही बापट म्हणाले.