मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीला हजर राहणार होत्या. परंतु, आता वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षा राऊत यांनी सोमवारी रात्रीची ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी ईडीला विनंती केली आहे कि, चौकशीला हजर होण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ईडी त्यांची ही विनंती मान्य करणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.
दरम्यान, ईडीच्या नोटिशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्यासाठी ईडीचा मुद्दा मोठा नसल्याचे सांगितले होते. तसेच तपस यंत्रणांची भीती दाखवत सरकार पडण्याचा भाजपचा डाव असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.