पिंपरी – महापालिका स्थायी समिती सभेला जाणूनबुजून अनुपस्थित राहणाऱ्या विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 11 तारखेला झालेल्या स्थायी समिती सभेस बरेचसे विभागप्रमुख अनुपस्थित होते. याबाबत स्थायी समिती सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, स्थायी समिती सभेत विभागप्रमुखांनी त्यांच्या विषयाला अनुसरून आवश्यक कागदपत्रे व माहिती सभेमध्ये सादर करणे आवश्यक असल्याने प्राधान्याने उपस्थित राहणे आवश्यक व बंधनकारक आहे. एखाद्या वेळी विभागप्रमुखास शक्य नसल्यास त्या विभागाचे शाखाप्रमुख अथवा अन्य अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अभिप्रेत आहे. ज्या विभागाचा विषय स्थायी समितीच्या होणाऱ्या सभेच्या कार्यपत्रिकेवर असेल त्या विभागाच्या विभागप्रमुखांनी सभेला उपस्थित राहणे बंधनकारक असेल. ज्या विभागाचे विषय स्थायीच्या कार्यक्रम पत्रिकेवर नसतील त्या विभागप्रमुखांनी मुख्यालयात उपस्थित राहून ऑनलाइन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सभेला उपस्थित राहावे.
एखाद्या विषयाबाबत पाचारण केल्यास तात्काळ स्थायी समिती सभागृहात संबंधितांनी उपस्थित होणे आवश्यक आहे. या प्रकरणी गैरहजर असल्याचे अथवा जाणुनबुजून हेतुपुरस्सर अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.