- शहरातील करोनाबाधितांचा आकडा 90 हजारांच्या पार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील आणखी 179 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे आतापर्यंतचा शहरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा 90 हजार 125 इतका झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुुरुवारी सायंकाळी हाती आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार 179 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरातील चार आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या एक अशा एकूण पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत शहरातील 1577 आणि शहराबाहेरील 652 अशा एकूण 2229 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 86856 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
सध्या 1790 रुग्ण उपचाराधीन असून केवळ 628 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 1064 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत 4 लाख 35 हजार 360 जणांची करोना चाचणी शहरात करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 44 हजार 269 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 966 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्हा रुग्णालयात 7 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. 19) 7 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 5 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जगताप डेअरी, खडकी, औंध, काळेवाडी, पिंपळे निलख येथील रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोनाबाधितांमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह 6 महिलांचा समावेश आहे. 43 वर्षीय पुरुष रुग्णालाही करोनाची लागण झाली आहे. खेड शिवापूर, जुनी सांगवी, औंध, रहाटणी येथील करोनामुक्त झालेल्या 5 जणांना आज घरी सोडण्यात आले. त्यामध्ये 2 महिला आणि 3 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 26 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 150 जणांचा आत्तापर्यंत करोनाने बळी घेतला आहे. तर, एकूण 578 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.