वाघळवाडी -करोनाबाधित रुग्ण सापडल्याने वडगाव निंबाळकर गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी संपल्यानंतर गावातील सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, या मागणीचे निवेवदन वडगाव निंबाळकर येथील नाभिक समाजाच्या वतीने मंडलाधिकारी संजय माने यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी तलाठी रवींद्र कदम, संत सेना महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव राऊत, गणेश जाधव, भरत क्षीरसागर, पांडुरंग पवार, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. करोना विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून गावातील सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
दोन महिन्यांपासून दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिक आणि कारागिरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. ग्राहक आणि सलून कारागिरांना करोनाची बाधा होऊ नये, यासाठी सर्व अटींचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, असे आश्वासनही नाभिक समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे दिले आहे.