जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : नियम पाळण्याचे आवाहन
आदेशांतील एकवाक्यतेसाठी महसूल, पोलीस, पालिका आयुक्तांची संयुक्त पत्रकार परिषद
पुणे – लॉकडाऊनमध्ये पुणे शहरातील कंटेंन्मेट झोन वगळून इतर भागांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी दारूच्या दुकानांमध्ये गर्दी होती. यामध्ये सोशल डिस्टन्स पाळण्यात आले नाही. त्याचबरोबर वाहनेदेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसली. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून नियमांचे पालन झाले नाही, तर पुणे शहरात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी कठोर करण्यात येईल. आवश्यकता वाटल्यास लॉकडाऊनची मुदत असलेल्या दि.17 मे पर्यंत दुकाने पुन्हा बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्तांनी दुकानांना दिलेली परवानगी आणि पोलिसांकडून दुकानांसाठी देण्यात आलेल्या वेळा त्याचबरोबर आदेश यामध्ये विसंगती होती. यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला होता. आदेशांमध्ये एकवाक्यता नसल्याने अनेक दुकानदारांनी दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. शहरात गोंधळाचे वातावरण झाल्याचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम उपस्थित होते.
गर्दी दिसल्यास वाइन शॉपचा परवाना रद्द
वाइन शॉपवर गर्दी होत आहे. यापार्श्वभूमीवर विक्रेत्याने सकाळी 10 ते 2 आणि दुपारी 2 ते 5:30 या वेळेत टोकन द्यावे, त्यानुसार मद्य विक्री करावी. ग्राहकांमध्ये 5 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. रांगेत फक्त 50 लोकांनाच परवानगी असणार आहे. अशी नियमावली वाइन दुकानांसाठी दिली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास वाईन शॉपचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
परप्रातीयांसाठी दौंड-लोणी काळभोर येथून विशेष रेल्वे धावणार
शहरातील परप्रांतियांना जाण्यासाठी आवश्यक ती सोय करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाशी बोलणे सुरू आहे. रेल्वे 1,200 प्रवासी असल्यास विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही विशेष रेल्वे मध्ये कुठेही थांबा घेणार नाही. प्रवाशांना एक वेळेचे जेवण आणि पाण्याची बॉटल दिली जाणार आहे. लांबचा प्रवास असेल तर जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. पुणे स्टेशन येथून रेल्वे सोडण्यात येणार नाही. दौंड अथवा लोणी येथून रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्या ठिकाणांपर्यंत सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे. परवानगी घेण्याच्या प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्याने विलंब होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्दे
– शहरातील दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार – पोलीस आयुक्त
– मर्यादित वाहनांना रस्त्यावर परवानगी – जिल्हाधिकारी
– पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योगांना परवानगी नाही – जिल्हाधिकारी
– शहरात कोणती दुकाने सुरू ठेवायची आणि कोणती दुकाने बंद याचा निर्णय महापालिका आयुक्त घेणार
– कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई