नागपूर – नागपूर ते काटोल चौपदरी रस्त्याच्या कामासाठी परवानगी मिळण्यासाठी अनिल देशमुख यांनी मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे या रस्ताचे काम मार्गी लागले, असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले.
काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, नागपूर ते काटोल या चौपदरी रस्त्याचा आज शुभारंभ झाला आहे. या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. माझा जन्म तुमच्या आधी झाल्याचे मी त्यांना म्हटले. इतक्या वर्षात इथे कोणत्या गावात वाघ शिरला नाही, तर तुम्ही कुठे घुसवत आहात. त्रास द्यायचे काम कशाला करता.
यानंतर अनिल देशमुखांनी मदत केली, तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली. नाहीतर मिळतचं नव्हती. या रस्त्याकरता त्यांचेही मी आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण होणार आहे. नागपूरमध्येही रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, मनी लॉंड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या 700 पानांच्या पुरवणी आरोपपत्रात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हणून नाव दिले आहे.