कोल्हपूर – बुली बाई नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अँपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत धागे दोरे हाती लागले असून; लवकरच या प्रकरणाचा पर्दा फाश करू अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. याबाबत सायबर सेलला आपण चौकशीचे आदेश दिल्याचही त्यांनी सांगितले. ते कोल्हापूरात बोलत होते.
एका अज्ञात गटाकडून गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केले जात आहे. याची दखल आता राज्याच्या गृह खात्याने घेतली असून याबाबत आपण सायबर सेलला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. शनिवार, 1 जानेवारी रोजी बुली बाई नावाने अॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाबाबत धागे दोरे हाती लागले आहेत. मात्र, तपास सुरु असल्याने आपण आताच काही बोलणार नाही. परंतु लवकरच याचा पर्दा फाश करू असेही गृहराज्यमंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.
दरम्यान ज्या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत, त्याबरोबर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्या फोटोंचा लिलाव केला जात आहे. यात एका महिला पत्रकाराचा फोटो अपलोड करण्यात आला असून आक्षेपार्ह मजकूरासह तो शेअर केला जात आहे. याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केंद्रसरकार वर निशाना साधला आहे. तसेच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.