नाशिकजवळ हॉलिडे एक्‍स्प्रेसचे चाक तुटले

गार्डच्या सर्तकतेमुळे सुदैवाने अपघात टळला 

भुसावळ-मुंबई मार्गावरील सेवा ठप्प

मनमाड – नाशिक जिल्ह्यातील नांदगावजवळ सकाळी बरेली-मुंबई या हॉलिडे एक्‍स्प्रेसचा होणारा संभाव्य अपघात सुदैवाने टळला. ट्रेनचे एक चाक तुटल्याचे वेळीच गार्डच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे उत्तर महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या मध्य रेल्वेतर्फे समर स्पेशल गाड्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. बरेली-मुंबई ही एक्‍सप्रेस आठवड्यातून एकदाच धावते. ही ट्रेन आज नेहमीप्रमाणे मुंबईला येत असताना नांदगाव रेल्वे स्थानकात येण्याच्या तीन ते चार किलोमीटर आधी या गाडीच्या गार्डच्या पुढील बी 15 या बोगीच्या ब्रेक व्हिलचे तुकडे पडले.

बोगी डळमळत असल्याचे बोगीतील एसी अटेन्डन्स कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने गार्डच्या बोगीत जाऊन याविषयी माहिती दिली. गार्डने गाडीची साखळी ओढत गाडी थांबली. खाली उतरल्यावर बी 15 या बोगीच्या एका बाजूचे चाक तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली.

काही वेळातच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर गाडीचे दोन्ही डबे जागीच काढण्यात येऊन उर्वरित गाडी प्रवाशांना घेऊन नांदगाव रेल्वे स्थानकात नेण्यात आली. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पोहचल्यानंतर अपघातग्रस्त बोगीचे काम सुरु झाले.

या बोगीला तीन तासानंतर त्या ठिकाणाहून रेल्वे यार्डात नेण्यात आले. यामुळे मागून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या अन्य रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. काही वेळानंतर भुसावळ-मुंबई मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक हळूहळू सुरु करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.