पाण्याच्या आश्‍वासनांवर झुलतोय बारामती तालुक्‍याचा पश्‍चिम भाग

file pic

कित्येक निवडणुका झाल्या; मात्र हक्‍काचे पाणी आलेच नाही : ऐन पावसाळ्यात टॅंकरवरच नजरा

– प्रमोद ठोंबरे

बारामती – बारामतीच्या विकासाचा सर्वत्र उदोउदो केला जातो. मात्र, याच बारामती तालुक्‍यातील 22 गावांसह 35 वाड्यावस्त्यांमध्ये दुष्काळ पाचवीलाच पुजला आहे. गेल्या कितेक निवडणुकीत फक्‍त सत्ताधारी व विरोधकांकडून पाण्याचे आश्‍वासन मिळाले, पण नागरिक याच आश्‍वासनावर झुलत राहिले अन्‌ गावे मात्र कोरडीच आहेत. विशेष म्हणजे या दुष्काळी परिसरात आतापर्यंत कित्येक कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना उभारल्या. मात्र, तांत्रिकदृष्ट्या योजना असंक्षम असल्याने यातील अनेक योजना सध्या गंजलेल्या अवस्थेत असल्याने येथेल नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे, तर अनेकांच्या नजरा टॅंकरवर लागलेल्या आहेत.

याठिकाणी नापिकी, जनावरांना चारा नसणे आणि पिण्यासाठी पाण्याचा अभाव असे एकत्रित संकट नेहमीच उभे असते. येथील नागरिकांना सिंचनासाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत तालुक्‍यातील पावसाचे प्रमाणही कमी झाले असून ते यंदाही अत्यल्प असल्यापने येथील नागरिकांना प्रशासनाची, निसर्गाची साथ मिळत नसल्याने त्याला दोन वेळच्या भाकरीची चिंता लागली आहे.

आंदोलने केवळ चर्चेपुर्तेच राहिले…
गेल्या काही वर्षांपासू येथील नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाला असला तरी हे आक्रमण “बोथट’ करण्याची ताकद राजकीय पुढाऱ्यांकडे असल्याने नागरिकांचा हा आक्रमपणा केवळ बातम्या व सोशल मीडियावर चर्चेपुरताच शिल्लक राहिला असल्याचे आतापर्यंत झालेल्या आंदोलने, रास्तारोको, मतदानावर बहिष्कार (निवडणुकीचे अस्त्र) किंवा इतर प्रकारच्या आंदोलनावर सिद्ध झाले आहे. तर याच आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधक केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्या व्यतरिक्‍त काही करीत नसल्याचेही आतापर्यंत झालेल्या निवडणुकांवरून सिद्ध झाल्याने दुष्काळी भाग यंदाच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.

रोजगारासाठी स्थलांतर…
जिरायती भागातील अनेक तरुणांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले आहे. पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे चारा महागला आहे. चारा महागल्याने दूध व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. परिणामी जनावरे बाजारामध्ये कमी किमतीत विकावी लागत आहेत. आलेल्या पैशातून येथील युवक बारामती येथील एमआयडीसी, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, मुंबई येथे रोजगाराच्या शोधात फिरत आहेत.

चारा छावण्यांना मुदतवाढ मिळणार?
सध्या बारामती तालुक्‍यातील अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह 35 वाड्यावस्त्यांना 15 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तालुक्‍यात चारा छावण्याही सुरू आहेत. मात्र, या छावण्या सोमवार (दि. 30) पर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश आहे. मात्र, अद्यापही हवा तेवढा पाऊस बरसला नसल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर निर्माण झाला आहे. त्यामुळे छावण्यांची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी जोर धरीत आहेत. त्यातच निवडणुकीच बिगुल वाजला असल्याने यात चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय शासन घेऊन “पायावर धोंडा’ पाडून घेण्याची शक्‍यता कमीच असल्याने या छावण्यांना मुदत वाढ निश्‍चित मिळेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

राजकीय पुढाऱ्यांचे आश्‍वासनांचे “मृगजळ’
बारामती तालुक्‍याचा पश्‍चिम भाग सोडून इतर सर्व तालुका नीरा डावा कालव्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुजलाम-सुफलाम झाला असल्याने या सुजलाम-सुफलाम परिसराची राज्यासह देशात गवगवा केला जातो. मात्र, पश्‍चिम भागाबाबत प्रशासनासह सर्वच राजकीय पुढारी, पक्ष गप्प असतात. या सर्व राजकीय पुढाऱ्यांना निवडणूक आली की या भागातील प्रश्‍न डोळ्यासमोर येतात अन्‌ प्रचारात विविध आश्‍वासनांची खैरात करतात. यात “पाण्या’च्या मृगजळाला भुलून मतदार भरभरून मते देतो, अन्‌ मग पाच वर्षे पश्‍चाताप करण्याशिवाय काही करू शकत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here