नवी दिल्ली – जगातील अनेक देश सध्या रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून रशियावर अनेक देशांनी निर्बंध लावले आहेत. काल जवळपास 141 देशांनी रशियाविरोधात निषेध प्रस्ताव मंजूर केला. रशियाला केवळ 5 देशांचे समर्थन मिळाले. मात्र रशियानेही अनेक देशावर निर्बंध घातले आहेत. त्यांनी त्यांच्या रॉकेटवरून अनेक देशाचे झेंडे हटवले आहेत.
युक्रेनसोबतचे युद्ध आणि त्यानंतर आलेल्या निर्बंधांदरम्यान रशियाने अमेरिका, ब्रिटन आणि जपानचे ध्वज हटवले, पण आपल्या अंतराळ रॉकेटवर भारतीय तिरंगा कायम ठेवला. तसेच भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्याबाबतही रशियाकडून वेळोवेळी अलर्ट देण्यात येत आहे.
बुधवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात याबाबत फोनवरून चर्चाही झाली आहे. त्यामुळे सध्या तरी भारत आणि रशियाच्या संबंधावर युद्धाचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. रशिया युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. या आठ दिवसात साऱ्या जगाने बेचिराख युक्रेन बघितले आहे. दोन दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसध्ये वाटाघाटीवर चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने युद्ध सुरुच राहिले.
आज पुन्हा या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र युक्रेनने रशियाशी चर्चा करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हे युद्ध थांबण्याची शक्यताही लांबणीवर गेली आहे. या युद्धात युक्रेनचेही मोठी नुकसान झाली आहे. मात्र रशियाचे 9 हजार सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन अजूनही झुकलेला नाही.