कोरोना कोविड 19 या विषाणूचा विळखा जगाला पडला असला तरी त्याचा उगम चीनमध्ये झालेला आहे. वुहानमधून हळूहळू जग व्यापलेल्या या विषाणूला चीनने मात्र आता नियंत्रण मिळवले आहे. तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तसेच नागरिकांचे बाहेर फिरणेही आता सुरू झाले आहे. इतकेच नव्हे तर विदेशी पर्यटकांसाठी टुरिस्ट स्पॉटही खुले झाले आहेत. याजोडीला चीनमधील सिनेमा उद्योगही आता उभारी घेत आहे.
चीनमध्ये सामाजिक सक्रियतेची सुरुवात तेथील सिनेमागृहे खुली झाल्यानंतर झाली. आतापर्यंत जवळपास 600 ते 700 चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत. तथापि, आतापर्यंत एकही ब्लॉकबस्टर चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झालेला नाहीये. कारण सिनेमागृहांमध्ये अद्यापही प्रेक्षकांची संख्या फारशी दिसत नाहीये.
प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्यासाठी चीनला सुपरहिट चित्रपटांची गरज आहे. यासाठी ते देशी निर्मात्यांबरोबरच विदेशी निर्मात्यांकडेही आशेने पहात आहेत. विशेषतः हॉलीवूडमधील हिट चित्रपट यासाठी उपयुक्त ठरतील अशी चीनची अटकळ आहे. खास करुन “ऍव्हेंजर्स’ या हॉलीवूडपटाकडून चीनला मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे चारही भाग येणाऱ्या काही दिवसांत चीनमधील सिनेमागृहात झळकणार असल्याचे समजते. चीनमधील वितरकांना हॉलीवूडच्या जुन्या ब्लॉकबस्टर चित्रपटांवर विश्वास आहे. त्यामुळे ते या चित्रपटांसाठी सिनेमागृहांच्या शोधात आहेत. यामध्ये “अवतार’, “इन्सेप्शन’ आणि “इंटरस्टेलर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.