पुणे, दि. 20 -फक्त “चूल, मूल’ ही संकल्पना कधीच कालबाह्य झाली, असे सध्या घडत असलेल्या काही घटनांवरून तरी वाटते. म्हणजे अंतराळवीर, क्षेपणास्त्र बनवणारी, संशोधिका, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधित्त्व करणारी, राजकारणी, नेता अशा एक ना अनेक आघाड्यांवर आता आपण महिलांना पहात आहोत. आता लष्कराच्या काही “स्पेस’मध्ये जिथे महिला नव्हत्या, तिथे आता महिलांचा आव्वाज घुमू लागला आहे. नुकत्याच झालेल्या “एनडीए’च्या परीक्षेत अव्वल आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे. एवढेच नव्हे तर या दोघीही “महाराष्ट्र कन्या’ आहेत, याचा नक्कीच अभिमान महाराष्ट्राला आहे.
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि केरळमधील एझिमला येथील भारतीय नौदल अकादमीत प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रुबीन सिंह हा पहिला आला आहे, तर अनुष्का अनिल बोर्डे या मुलीने दुसरा, तर वैष्णवी गोरडे या मुलीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या दोघीही महाराष्ट्रातील आहेत. त्यातील अनुष्का हिला कुटुंबात कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नाही.
“यूपीएससी’मार्फत घेतल्या जाणाऱ्या “एनडीए’च्या प्रवेश परीक्षेसाठी मुलींना बसण्यास परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. ही संधी मुलींसाठी पर्वणीच ठरली आणि थेट लेफ्टनंट या पदावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर “एनडीए’ची प्रवेश परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या वाढली आणि संधी मिळाले त्याचे सोने करत या मुलींनी अव्वलही येऊन दाखवले. या आधीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये एका मुलीचा समावेश होता. यंदाच्या निकालात पहिल्या दहा “ऑल इंडिया रॅंक’ मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दोन मुलींचा समावेश असून, त्यांनी “टॉप थ्री’मध्ये स्थान मिळवले आहे. उत्तीर्ण होण्यात मुलींची संख्या वाढत आहे, ही देखील आनंदाचीच बाब म्हणावी लागेल.
या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 519 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि “भारतीय नौदल अकादमी’ या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10 एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या “सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’द्वारे मुलाखती घेण्यात आल्या. त्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. “एनडीए’मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 149 व्या तुकडीत प्रवेश देण्यात येणार आहे, तर भारतीय नौदल अकादमीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्या संस्थेच्या 111 व्या तुकडीत प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुण पुढील पंधरा दिवसांत “यूपीएससी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.