कंधमाल (ओडिशा) – ओडिशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका व्यक्तीला पीडितेच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. पीडितेच्या वडिलांनी आणि काकांनी बलात्कार करणाऱ्या इसमाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये आरोपीचा जागेवर मृत्यु झाला. पिडीतेचे वडील आणि काकांनी नंतर ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
जिल्हा मुख्यालय फुलबनीपासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेल्या रायकिया पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावात ही घटना घडली. शनिवारी दुपारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या घराबाहेर फिरत असताना तेथील कॉंक्रीट मिक्सिंग मशीनच्या ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीला एका कंत्राटदाराने काही कामासाठी नेमले होते. हा ऑपरेटर मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या पिडीतेच्या वडिल आणि काकांनी आरोपीला काठ्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असे रायकिया पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघांनीही पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. पिडीत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.