ढेबेवाडी -महिंद, ता. पाटण येथील बौद्ध वस्तीत सोमवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीवर खेळणाऱ्या अनुष्का दिनेश यादव (वय 12) व शेजल अशोक यादव (वय 8) यांचा मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महिंद येथील बौद्ध वस्तीतील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का, शेजल व एक लहान मुलगा सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खेळत होते. त्या घराच्या मागे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवरून वानरांचा कळप उड्या मारत होता. त्या लगतच्या पडक्या घराच्या छपरास लागलेल्या मधमाशांच्या पोळ्याला वानरांचा धक्का लागला. त्यामुळे चवताळलेल्या माशांनी गच्चीवर खेळणाऱ्या मुलांवर जोरदार हल्ला केला. मधमाशांच्या चाव्याने बेजार झालेल्या मुलांचा आरडाओरडा ऐकून यादव यांच्या कुटुंबातील काही जण मदतीसाठी गच्चीवर धावले. त्यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनुष्का, शेजल व अन्य पाच जणांना उपचारासाठी तळमावलेतील खासगी दवाखान्यात तातडीने नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना अनुष्काचा काही वेळातच तर मध्यरात्री एकच्या सुमारास शेजलचा मृत्यू झाला. येळगाव, ता. कराड हे अनुष्काचे मूळ गाव असून ती काही दिवसांपूर्वीच महिंद येथे आजोळी गेली होती. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.