‘डिजिटल’ वाटचाल करणाऱ्या ब्रिटीश लायब्ररीचे दातृत्व

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिली 18 हजार पुस्तके

व्यंकटेश भोळा

पुणे – इंग्रजी पुस्तकांची वाचनसंस्कृती पुण्यात रुजवण्यामध्ये मोठे योगदान देणाऱ्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने आता “डिजिटल’ लायब्ररीकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांनी कोट्यवधींची जवळपास 18 हजार पुस्तके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिले आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयात मोठी भर पडली आहे.

 

ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट शिक्षण, कला आणि संस्कृती सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने पुण्यात दि.29 सप्टेंबर 1960 रोजी ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीची स्थापना करण्यात आली. या लायब्ररीने ऑनलाइनकडे लक्ष केंद्रित केले आहे. वाचक कोठेही, केव्हाही अमर्याद डिजिटलद्वारे लायब्ररीचा वापर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या सुमारे 18 हजार असलेले प्रत्यक्षातील पुस्तके विद्यापीठाला देण्याचा निर्णय ब्रिटिश लायब्ररीने घेतला आहे. इंग्रजी भाषा, इंग्रजी साहित्य, धर्म, व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि डिझाइन, क्रीडा आणि मुलांची पुस्तकांचा समावेश आहे.

 

यासंदर्भात पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, “ब्रिटिश लायब्ररीने त्यांच्याकडील 18 हजार पुस्तके विद्यापीठाला देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 14 हजार पुस्तके विद्यापीठाला प्राप्त झाली आहेत. ही सर्व पुस्तके नव्याने उभारण्यात आलेल्या सामाजिक शास्त्र संकुलातील सुसज्ज ग्रंथालयात ठेवण्यात येत आहे.’

 

तब्बल 61 वर्षापूर्वी इंग्रजी साहित्य, युरोपातील साहित्याची ओळख करून देण्यात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने मोठी भूमिका बजावली आहे. नामदार गोखले रस्त्यावर फर्गसन कॉलेजजवळ 2017 पर्यंत ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी कार्यरत होती. काळानुसार नवीन पर्याय उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ही लायब्ररी दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयाशेजारील इमारतीमध्ये हलवण्यात आली. आता ही लायब्ररी डिजिटल रूप धारण करत आहे.

 

जयकर ग्रंथालयात लाखोंनी पुस्तके विद्यार्थ्यांना खुली आहेत. आता ब्रिटिश लायब्ररीकडून सुमारे 18 हजार पुस्तके उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या ग्रंथसंपदेत भर पडत असून, ही विद्यापीठाच्या दृष्टीने भूषणावह आहे.

– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.