पुणे(प्रतिनिधी) : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर गोळीबार करून फरार झालेल्या कुख्यात गुन्हेगार गणेश पवार याच्या टोळीतील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सातारामधील सुरूस फाटा येथे सापळा लावून अटक केली आहे. सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी अशी या दोघांची नावे आहेत.
गणेश पवार आणि त्याच्या टोळीने एकास गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संबंधितास कोयत्याने व हाताने मारहाण करीत तेथील परिसरात दगडफेक करून स्थानिकांच्या मनात दहशत निर्माण केली. शनिनगर परिसरात गुरुवारी (ता. 10) हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सिद्धीकी मोला शेख (रा. शनिनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पवार व त्याच्या टोळी विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार सर्फराज देशमुख आणि सचिन पवार यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, पवार आणि सोन्या कांबळे यांनी गोळीबार केला आहे. कांबळे आणि विशाल सोमवंशी हे सातारा भागातील सुरूस फाटा येथे पळून गेले आहेत. त्यानुसार तेथे सापळा लावण्यात आला होता. तेव्हा त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
कांबळे याने गणेश पवार याच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांनी ही कारवाई केली.