करोना हा शब्दसुद्धा ऐकायला आता कोणालाही आवडत नाही. पण आता याच विषयावर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये निर्माण झालेली दोन भिन्न प्रकारची स्थिती हा आज चर्चेचा विषय ठरली आहे.
भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालय दररोज करोना आकडेवारीची अपडेट देत असते, आज त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात नव्याने करोनाची लागण झालेल्या रुग्णांची गेल्या 24 तासांतील संख्या नीचांकी होती. या 24 तासांत भारतात जेमतेम 250 नवे करोना रूग्ण आढळून आले आहेत आणि देशातील करोना सक्रिय रुग्णांचे प्रमाणही आता केवळ चार-साडेचार हजारांवर आले आहे. म्हणजेच करोना आता भारतातून हद्दपार होण्याच्या स्थितीत आला आहे, असे आपण ठामपणे म्हणू शकतो. ही बऱ्यापैकी आनंदाची स्थिती आहे. पण या आनंदावर चीनमधील बातमीने पुन्हा काहीसे विरजण पडले आहे. चीनमध्ये पुन्हा करोना मोठ्या प्रमाणात फोफावला असून तेथे पुन्हा हजारोंच्या संख्येने करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तेथे काल एका दिवसात करोनाचे तब्बल चाळीस हजार रुग्ण आढळले होते.
चीन हा भारताला लागूनच असलेला देश असल्याने आणि भारतात चीनमधूनच पहिल्यांदा करोना आला होता व तो संपूर्ण देशभर पसरला होता ही स्थिती सर्वांनाच माहिती असल्याने तेथील या नव्या बातमीमुळे पुन्हा भारतात धास्तीचे वातावरण निर्माण होऊ शकते. चीन हा जगातला एकमेव असा देश आहे की त्यांनी सगळ्यात प्रथम करोनाला अत्यंत प्रभावीपणे नियंत्रणात आणले होते. जगभर करोनाचे थैमान सुरू असताना चीन मात्र करोनामुक्त झाल्याच्या बातम्या आपण त्यावेळी वाचल्या होत्या. पण त्याच चीनमध्ये आता नव्याने करोनाने थैमान सुरू झाल्याने भारतात नीचांकी लागण झाल्याच्या बातमीला पुन्हा चिंतेची झालर निर्माण झाली आहे. चीनमध्ये अनेकांना या आधीच करोना लसीचे डोस दिले गेले आहेत. तेथे जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा अत्यंत काटेकोर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. असे असताना या रोगाने तेथे पुन्हा वेगळ्या अवतारात प्रवेश करून हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. करोनाच्या या आधीच्या काळात जगात ज्या तीन लाटा आल्या होत्या त्या काळातही चीनमध्ये करोनाचे जितके रुग्ण सापडले नव्हते त्यापेक्षा अधिकच रुग्ण सध्या तेथे आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे चीन सरकारने आधीच्या काळानुसारच अत्यंत कडक स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्याने तेथील जनता चांगलीच धास्तावली आहे. त्यांनी या उपाययोजनांच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
चीनमध्ये हुकूमशाही पद्धतीची कम्युनिस्ट राजवट आहे. तेथे सरकारच्या विरोधात बोलताही येत नाही आणि आवाजही उठवता येत नाही. पण करोना उपाययोजनांच्या विरोधात तेथील जनता आता फारच त्वेषाने रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे सरकारही बिथरले आहे. तेथील सरकारला अशा विरोधाची आजवर कधीच सवय नव्हती. त्यामुळे लोकांमधील या वाढत्या नाराजीला कसे आटोक्यात आणायचे हा मुख्य प्रश्न तेथील राजवटीपुढे प्रथमच निर्माण झाला आहे. करोना आटोक्यात आणायचा की लोकांना आटोक्यात आणायचे हा द्विधा पेच चीनमध्ये निर्माण झाला आहे. चीन सरकारकडून तेथे झिरो कोविडची जी उपाययोजना केली जाते ती रोगापेक्षा भयंकर असते असे म्हणतात. तेथे लॉकडाऊन म्हणजे लोकांना थेट घरात कोंडूनच ठेवण्याचा प्रकार असतो. त्यांची घरे बाहेरून लाकडी पट्ट्या ठोकून बंद केली जातात आणि चुकूनही रस्त्यावर दिसणाऱ्यांना थेट कारागृहात धाडले जाते. कसलीही दयामाया न दाखवता करोना आटोक्यात आणण्याला चीनने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यानुसार ते काही काळापुरता करोना नियंत्रणात आणतात पण पुन्हा तेथे हा रोग नव्याने डोके वर काढतो आणि सरकारही माथेफिरूप्रमाणे सामान्य जनतेला जवळपास कैदेतच टाकते. त्यामुळे चिनी जनता अक्षरश: या प्रकाराला विटली आहे. त्यांना आता चीनची कम्युनिस्ट राजवट नकोशी झाली आहे आणि अध्यक्ष जिनपिंग हे तेथील जनतेला डोळ्यासमोरही नकोसे झाले आहेत.
करोना परवडला पण आता जिनपिंग नको, अशा टोकाच्या मानसिकतेपर्यंत तेथील लोक आले आहेत. त्यामुळे या वेळचा करोना जिनपिंग यांच्या राजवटीचाच बळी घेतो की काय अशा स्थितीत सध्या चीन आला आहे. चीनमधील या घडामोडींचे परिणाम शेजारच्या भारतावरही होऊ शकतात. भारताचा हजारो किमीचा भाग चीनला लागून असल्याने तेथील करोनाचे संक्रमण पुन्हा भारतात शिरकाव करील काय, ही धास्ती असल्याने चीनच्या करोनाचा विषय भारतीयांना गांभीर्यानेच घ्यावा लागतो. करोनाचा विषाणू परिस्थितीनुसार आपले स्वरूप बदलतो आणि तो करोना लसीलाही डावलून आपला फैलाव वाढवतो, असा अनुभव असल्याने ही भीती आणखीनच गडद होते.
भारतात करोना फैलावणारच नाही असे छाती ठोकपणे सांगणाऱ्या भारतातील राज्यकर्त्यांना नंतरच्या काळात काय भीषण स्थितीला सामोरे जावे लागले होते याचा इतिहास फार जुना नाही. त्यामुळे भारत सरकारलाही चीनमध्ये निर्माण झालेल्या करोना स्थितीला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे हे निश्चित. आज भारतातील करोना रुग्णांची संख्या जेमतेम 250 इतकी खाली असली तरी भारतातील करोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही हे वास्तवच आहे.
अर्थात आधीच्या अनुभवाने पोळलेल्या भारतीय यंत्रणेला करोना नियंत्रणाचा पुरेसा अनुभव प्राप्त झाल्याने भारतीय सरकारी यंत्रणा पूर्वी इतकी गाफील राहणार नाही. किंबहुना त्यांना आता करोना नियंत्रणाचे पुरेसे कौशल्य प्राप्त झाल्याने आपल्याला तशी धास्ती बाळगण्याचे कारण नाही. लोकांचे सहकार्य आणि वैद्यकीय यंत्रणेची तत्परता यावर आपल्याला भिस्त ठेवावी लागणार आहे. त्यातून आपण नवीन धोका पुन्हा नाहीसा करू हा आत्मविश्वास आपल्यात बळावला आहे. पण तरीही आपल्याला जागरूक राहावेच लागणार आहे हे मात्र नक्की.