कवठे – खंबाटकी घाट उतरल्यावर तीव्र उतारावर रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक हणमंत कदम (वय 38, रा. हडपसर, पुणे) किरकोळ जखमी झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पुण्याहून गोव्याला फळे भरून चाललेला टेम्पोला (वाहन क्र. एमएच 12 एफसी 8875) खंबाटकी घाट उतरल्यावर तीव्र उतारावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (वाहन क्र. एमएच 05-एएम3067) धडक दिली. त्यामुळे टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटला व टेम्पो महामार्गालगत असलेल्या जाळ्या तोडून पलटी झाला. सुदैवाने या टेम्पोत चालकाशिवाय अन्य कोणी नव्हते.
दरम्यान ट्रकचालकाने ट्रकसह तेथून पलायन केले. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर वेळे येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.