जिल्हा समन्वयकपदी तिघे बिनविरोध

लोणी काळभोर – पुणे जिल्ह्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांच्या मागण्या सक्षमपणे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या माध्यमातून मांडण्यासाठी कृषी पदवीधर जिल्हा समन्वयकपदी तिघांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

हवेली पंचायत समितीतील ग्रामविकास अधिकारी एम. पी. चव्हाण, खेड पंचायत समितीतील ग्रामसेवक सुदाम कड, महिला प्रतिनिधी म्हणून पुरंदर पंचायत समितीतील ग्रामसेविका मीरा होले यांची जिल्हा ग्रामसेवक युनियनमध्ये बिनविरोध निवड झाली. या संदर्भात अधिक माहिती देताना एम. पी. चव्हाण म्हणाले की, राज्यात कृषी पदवीधर ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. शासन व्यवस्थेमध्ये समान काम, समान वेतन दिले जात नाही.

शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी दिली जाते; परंतु पदवीधर ग्रामसेवकांना दिली जात नाही. कृषी विभागाकडे काम करणाऱ्या कृषी सहाय्यकांना तांत्रिक दर्जा दिला जातो; पण त्यापेक्षा उच्च शिक्षित असणाऱ्या कृषी पदवीधर ग्रामसेवकांना नाकारला जाते. तलाठी ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक ही समकक्ष पदे असताना वेतनश्रेणीमध्ये भेदभाव होतो. यामुळे एकूणच कृषी पदवीधर ग्रामसेवकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

या सर्व प्रश्‍नांचा अभ्यास करून शासनाकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पुणे जिल्हा शाखेमार्फत मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती एम. पी. चव्हाण यांनी दिली. या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका राज्य युनियन कार्याध्यक्ष अनिल कुंभार, विभागीय अध्यक्ष घोळवे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, जिल्हा सरचिटणीस संदीप ठवाळ, तसेच जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी बजावली. या प्रसंगी पतसंस्था सचिव शंकर ढोरे आणि जिल्हा युनियनचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, सर्व तालुका अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.