बॅंकॉक – म्यानमारच्या पदच्युत राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांच्यावरील डझनभर खटल्यांपैकी भ्रष्टाचाराच्या पहिल्या खटल्यातील निकाल सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. या प्रकरणाचा निकाल बुधवारपर्यंत पुढे ढकलला गेला आहे. मात्र ही सुनावणी पुढे ढकलली जाण्याचे कोणतेही कारण न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही, असे विधी विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
स्यू की यांच्या खटल्याची सुनावणी बंद कक्षामध्ये करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या वकिलांनाही माध्यमांना या खटल्याबाबतची माहिती देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांच्यावर चालवल्या जात असलेल्या खटल्यांमध्ये दोषी आढळल्यास त्यांना 15 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
वरिष्ट राजकीय सहकाऱ्याकडून लाच म्हणून सोने आणि शेकडो हजारो डॉलर स्वीकारले असल्याचा आरोप स्यू की यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. स्यू की यांना पुन्हा राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर खोटे आणि अन्यायकारक आरोप लावण्यात आल्याचे मत स्यू की यांच्या समर्थकांनी आणि विधीज्ञांनी व्यक्त केले आहे.