मनासारखं काही घडत नसल्यास ग्रहच फिरलेतं अशी प्रतिक्रिया जनमानसातून चटकन उमटत असते. कॉंग्रेस पक्षाच्या बाबतीत काहीसं तसचं घडताना दिसतयं. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाचा मोठा गाजावाजा काही दिवसांपासून सुरू होता. मात्र, कॉंग्रेस आणि किशोर हातमिळवणी झालीचं नाही. किशोर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास दिलेला नकार तूर्त तरी त्या पक्षाच्या दृष्टीने प्रतिकूल घडामोड ठरली आहे.
एकीकडे भाजपची विजयी घोडदौड सुरू, तर दुसरीकडे कॉंग्रेसची पीछेहाट कायम असे चित्र आठ वर्षांपासून आहे. अशात अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसच्या हाती नामुष्कीजनक पराभव आला. त्यामुळे त्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. पण, निराशा झटकून संघटनात्मक फेरबांधणीसाठी कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्याचे जाणवू लागले. अशात कॉंग्रेस आणि किशोर जवळ येऊ लागल्याचे दिसू लागले. पक्षाला पुनरूज्जीवन देण्याच्या उद्देशातून किशोर यांनी एक योजनाही सादर केली. एवढेच नव्हे तर, किशोर थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही संकेत मिळू लागले.
निवडणूक रणनीतीकार म्हणून किशोर यांनी आतापर्यंत स्वत:चे नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश कॉंग्रेससाठी बुस्टर डोस ठरेल, अशी चर्चा सुरू झाली. किशोर यांच्या आगमनाने किमान त्या पक्षातील मरगळ तरी झटकली जाईल, असे बोलले जाऊ लागले. पण, कुठेतरी माशी शिंकली अन् किशोर यांचा कॉंग्रेस प्रवेश बारगळला. विविध पक्षांच्या विजयात मोलाचा हातभार लावण्याची किमया किशोर यांनी करून दाखवली आहे. तसे असले तरी ते कुणी जादूगार नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने कॉंग्रेसला लगेचच अच्छे दिन आले असते, असे म्हणणे धाडसाचे ठरावे.
साहजिकच, किशोर बरोबर नसले तरी कॉंग्रेसला आपली पुढील वाटचाल सुरूच ठेवावी लागणार आहे. किशोर यांच्या नकाराने अनेक कॉंग्रेसजन हिरमुसलेही असतील. पण, त्यांनी वयाने लहान असले तरी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मांडलेली एक मोठी भूमिका विचारात घ्यायला हवी. मार्केटिंग संस्था आणि प्रोफेशनल व्यक्तींना मदतीला घेऊन निवडणुका जिंकता येत असतील; तर श्रीमंत लोक राजकीय पक्ष स्थापून देशावर राज्य करतील, असे तेजस्वी यांनी म्हटले. त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षाला स्वबळावरच वाटचाल करावी लागणार असल्याचे सूचित केले.
अर्थात, किशोर यांचा देशभरात झालेला बोलबाला पाहता त्यांचा निर्णय काही काळ तरी कॉंग्रेसजनांसाठी यातनादायी ठरू शकेल. कॉंग्रेस सध्या प्रतिकूल स्थितीतून जात आहे. पक्षाला राजकीय हादरे देणाऱ्या घडामोडींची मालिकाच जणू सुरू आहे. त्यामध्ये आता किशोर यांच्या नकाराची भर पडली आहे.